मुंबई विद्यापीठात ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला! भाजपला धक्का देत सिनेटची निवडणूक जिंकली
सप्टेंबर २७, २०२४
0
शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेनं एकतर्फी विजय मिळवलाय. युवासेनेनं भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारली आहे. आगामी विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिल्यानंतर मंगळवारी राज्य सरकारला सिनेटची निवडणूक घ्यावी लागली होती. एकूण १० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत अनेक संघटना उतरल्या होत्या. मात्र खरी लढत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेना व भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) उमेदवारांमध्ये होती.
युवा सेनेचे विजयी शिलेदार कोण?
ठाकरेंच्या युवासेनेच्या शीतल देवरुखकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून (SC) ५४९८ मतं मिळवत अभाविपचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला. सायगावकर यांना केवळ १०१४ मतं पडली.
भटके विमुक्त प्रवर्गातून (NT) शशिकांत झोरे यांनी अभाविपच्या अजिंक्य जाधव यांचा पराभव केला. झोरे यांना ५,१७० मते मिळाली तर अजिंक्य जाधव यांना केवळ १०६६ मतं मिळवता आली.
महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी यांनी अभाविपच्या रेणुका ठाकूर यांना मात दिली. गवळी यांना ५९१४ मतं मिळाली तर ठाकूर यांना अवघी ८९३ मतं मिळाली.
ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेच्या मयुर पांचाळ यांनी अभाविपचे राकेश भुजबळ यांना जवळपास साडेचार हजारांहून अधिक मतांनी धूळ चारली. मयुर पांचाळ यांना ५३५० मतं मिळाली तर भुजबळ यांना ८८८ मतं मिळाली.
भाजप खासदाराच्या बहिणीचा पराभव
सिनेट निवडणुकीत भाजपचे खासदार हेमंत सावरा यांची बहीण निशा सावरा अभाविपच्या उमेदवार होत्या. अनुसूचित जमाती प्रवर्गातून (ST) त्यांनी निवडणूक लढवली होती. युवासेनेच्या धनराज कोहचाडे यांनी ५२४७ मतं मिळवत निशा सावरा यांचा पराभव केला. सावरा यांना अवघी ९१८ मतं मिळाली. निशा सावरा या माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत.
खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढलेले प्रदीप सावंत, मिलिंद साटम व परम यादव यांनीही बाजी मारली आहे.