पुणे मेट्रोसह २२,६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, राज्यात कालपासूनच परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. काल पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं पुण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. तर, रस्त्यांना अक्षरश: नद्यांचं स्वरूप आलं होतं. अनेक सोसायट्यांमध्येही पाणी शिरलं.
कालच्या पावसानंतर पुण्यातील जनजीवन व वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यातच भारतीय हवामान खात्यानं आज मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांसाठी रेड अॅलर्ट दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. एएनआयनं हे वृत्त दिलं आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा होता दौरा
महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत धक्का बसलेल्या भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले. मराठवाडा व विदर्भात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले व कामाला लागण्याचे आदेश दिले. एकीकडं संघटनात्मक तयारी सुरू असताना सरकारी पातळीवर विकासकामांची भूमिपूजनं व उद्घाटनं सुरू आहेत. पंतप्रधान मोदी त्यासाठीच पुण्यात येणार होते. मात्र, तूर्त हा दौरा टळला आहे. दौऱ्याची नवी तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.