मुंबईच्या आचार्य मराठे महविद्यालतील हिजाब बंदी योग्य असल्याचा निकाल मुंबई हाय कोर्टाने नुकताच दिला होता. विद्यालयाची हिजाब बंदी योग्य असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. दरम्यान, हिजाब बंदी लागू केल्यावर आता विद्यालयाने विद्यालय परिसरात जीन्स, टी शर्ट आणि जर्सीवर देखील बंदी घातली आहे. सोमवार पासून ही बंदी लागू करण्यात आली असून जीन्स टी शर्ट घालून आलेल्या अनेकांना माघारी पाठवण्यात आले.
हिजाब बंदीमुळे गेल्या वर्षभारांपासून चर्चेत असलेल्या मुंबईच्या चेंबूर येथील आचार्य-मराठी महाविद्यालयाने आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि जर्सी घालण्यास बंदी केली आहे. महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेसकोड लागू करत जीन्स, टी-शर्ट व जर्सीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांसाठी नवा ड्रेस कोड डोकेदुखी ठरणार आहे. या नव्या ड्रेस कोडची नियमावली महाविद्यालय प्रशासनाने जारी केली आहे.
महविद्यालयाने ड्रेस कोडचा नियम २७ जून पासून लागू केला आहे. यात फाटलेल्या जीन्स, टी शर्ट, अंग प्रदर्शन करणारे कपडे, जर्सी घालण्यास मनाई केली आहे. महाविद्यालयाच्या आवारात कोणता पोशाख घालावा या बाबत देखील नियमावलीत मार्गदर्शन करण्यात आले आहे. मुलासांसाठी कोणताही फॉर्मल हाफ शर्ट, फुल शर्ट आणि पँट घालण्यास परवानगी आहे. तर मुलींसाठी कोणताही भारतीय पोशाख घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, धर्म दर्शवणारा एकही पोशाख कुणी परिधान करु नये, असे म्हटले नियमावलीत म्हटले आहे. जर या प्रकारे कुणी काही परिधान केले असेल तर कॉमन रूममध्ये काढण्यात येईल असे देखील जारी करण्यात आलेल्या नोटीसीत विद्यालयाने म्हटले आहे.
आचार्य-मराठे महाविद्यालयात गेल्या वर्षी हिजाब बंदी करण्यात आली होती. या हिजाब बंदीमुळे मोठा गदारोळ झाला होता. आमच्या धार्मिक स्वातंत्रावर गदा येत असल्याचं म्हणतं विद्यालयातील ९ विद्यार्थीनींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या बाबत दाद मागीतली होती. यावर २६ जून रोजी निकाल देत विद्यालयाचा निर्णय योग्य ठरवत मुलींचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
महाविद्यालयाच्या नव्या नियमबद्दल स्पष्टीकर देताना प्राचार्य डॉ. लेले म्हणाले भविष्यातील कॉर्पोरेट कंपण्यातील कामासाठी आम्ही मुलांना तयार करत आहोत. कोणत्याही कंपण्यात काम करतांना फॉर्मल कपडे घालण्यावर भर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रकारचे कपडे अंगवळणी पडावे या साठी आम्ही त्यांना फॉर्मल्स कपडे घालण्यास सांगितले आहे. हे कपडे भारतीय किंवा पाश्चात्य असू शकतात.