राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आजपासून सुरू, विदर्भातील शाळा १ जुलै पासून

0

राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आज पासून सुरू होत आहेत. तर विदर्भातील शाळा या १ जुलै पासून सुरू होणार आहेत. र्वच शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. दरवर्षी राज्यातील शाळा या १३ जून रोजी सुरु होत असतात. मात्र, यावर्षी राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार आजपासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. राज्यातील शाळेचा पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या तसेच खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू पूर्ण करण्यात आली आहे. शाळापूर्व तयारीपासून प्रवेशोत्सवाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून शाळा वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्यात यावे अशा सूचना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी केल्या आहेत..

राज्यातील शाळांच्या प्रवेशापूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळापूर्व तयारीसाठी तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्र कर्मचाऱ्यांची बैठका घेण्यास सांगण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांचा देखील प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन बैठक होणार आहेत. राज्यातील सर्व शिक्षकांना रूजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पालकांना देखील शाळा प्रवेश आणि शाळा सुरू होण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी होणार पुस्तकांचे वाटप

शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. गुरुवारपासून दोन दिवस शालेय इमारत, वर्गखोल्या, शालेय परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. पहिल्या दिवशी शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यासाठी पालकांच्या घरी भेटी दिल्या जाणार आहेत.

शनिवार, दि. १५ जून हा यंदाच्या शैक्षणिक वर्षांचा शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेमध्ये पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले जाणार आहे, हा दिवस उत्साही व आनंदाचा व्हावा, यासाठी शाळास्तरावर उपक्रमांचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी अनुदानातून गणवेश मिळणे अशक्य झाले. शासनाने कापड दिले आहे. मात्र, हे गणवेश महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटामार्फत शिवून मिळणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना एक स्काऊट गाईड आणि दुसरा नियमित गणवेश मिळणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार १६८ शाळा असून, या शाळांमधील ७,६६,८५८ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार आहे. सर्व पुस्तके शाळांमध्ये पोहोच झाली असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी ती विद्यार्थ्यांना दिली जातील. अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)