पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवे नवे खुलासे होत आहे. आता पर्यंत या प्रकरणी १० जणांना अटक केली आहे. आरोपी मुलगा, वडील, आई, आजोबासह रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी डॉक्टरांना देखील अटक करण्यात आली आहे. मुलाच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळू नये म्हणून डॉक्टरांनी मुलाचे रक्ताचे नमुने बदलले होते. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असतांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खळबळजनक आरोप केला आहे. या अपघातात मृत झालेल्यांच्या व्हीसेरा रिपोर्टमध्ये दारूचे अंश मिळावे यासाठी तयारी करण्यात आल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. या बाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली असून त्यांच्या या आरोपामुळे खबळल उडाली आहे.
पुण्यात १९ मे रोजी कल्याणी नगर येथे बिल्डर विशाल अगरवालच्या मुलाने रात्री दारूच्या नशेत आलीशान पोर्शे कार चालवत अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडले होते. या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर बिल्डर विशाल अगरवालने मुलाला वाचवण्यासाठी तसेच त्याची मद्यचाचणी पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून रक्ताच्या नमुन्यात फेरफार केले होते. या प्रकरणी पोलिसांवर मोठे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससुनच्या डॉक्टरांना अटक केली होती. तर आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने हे त्याच्या आईचे असल्याचे देखील पुढे आले आहे. या प्रकानरी अल्पवयीन आरोपी मुलाला हा बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतांना आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या या आरोपावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि अल्पवयीन मुलाची आई शिवानीअग्रवाल यांना अटक करण्यात आली. मात्र, हा डाव फसल्यामुळे तसेच या प्रकरणी मृत तरुण-तरुणीचा दोष असल्याचे सिद्ध करण्याचे आता प्रयत्न सुरू झाला असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. देशमुख यांनी या प्रकरणी एक्सवर ट्विट केले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन मृत तरुण-तरुणी हे दारु पिऊन बाइक चालवत होते व त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. यामुळे विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, असे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे.