डोंबिवलीत लिफ्टचा पार्ट चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट; दत्तनगर मधील एका घटनेने खळबळ
जून ०४, २०२४
0
शहरात लिफ्ट चे सुटे भाग (पार्टस) चोरी होण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. एकाच परिसरात शक्कल लढवून दोन ठिकाणी एकाच पद्धतीने लिफ्ट चे पार्ट चोरी झाल्याने चोरांचा नवीन प्रकार समोर आला आहे.
पूर्वेतील दत्तनगर मधील टंडन रोड येथे बीएसयुपी प्रकल्पाच्या तीन इमारती आहेत. त्यापैकी दोन इमारती मध्ये लिफ्ट चा कॉईल हा पार्ट चोरीला गेल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे याच वेळेदरम्यान दोन लिफ्ट चे पार्ट चोरण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या साठी चोरट्याने लिफ्ट स्टॉप करून, विशिष्ट टेक्निक ने वरील मजल्यावरील दरवाजा उघडून अत्यंत जलद वेगाने काईल हा पार्ट लंपास केला. हे करत असताना स्वतः चा चेहरा कॅमेरा मध्ये दिसणार नाही याची पुरेपूर काळजी चोरट्याने घेतली आहे. सीसीटीव्ही फूटेज वरून या आधी चोरट्याने संबंधित भागाची रेकी केली असल्याची दाट शक्यता आहे. ज्या पद्धतीने चपखलपणे चोरी, चोरट्याचा वावर बघता हे समजते. धक्कादायक म्हणजे सोसायटी कडून अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नसून अत्यंत गंभीर प्रकरणाची हयगय केल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
खरतर अशा प्रकारात लिफ्ट कॉइल चोरल्यामुळे लिफ्ट ची हालचाल पूर्ण थांबून एकाच जागेवर उभी राहते. मात्र अशा चोरीच्या प्रकरणात एखाद्या यांत्रिक भागाला धक्का लागल्यास किंवा महत्वाची वस्तू चोरी झाल्यास लिफ्ट काही वेळा वेगाने खाली येऊन आदळण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी जीवितहानी ही ठरलेली असून अपघाताचा हा भयंकर प्रकार मानला जातो. अशा घटना बऱ्याचदा घडल्याच्या नोंदी आहेत. शिवाय हेच सफाईदार पणे चोरी करणारे चोरटे अशा टेक्निक चा वापर अशा पद्घतीने घातपातासाठी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना अशा गंभीर प्रकरणात संबंधितांनी हयगय करत साधी तक्रार नोंद न करणे हे एक प्रकारे गुन्हेगारास नुसते प्रोत्साहन देण्याचे नव्हे तर गुन्हेगारास अभय देण्यासारखे तसेच त्यास पाठीशी घालण्याची समाज विघातक कृती आहे.
शहरात अशा प्रकारे चोरी होण्याचे प्रकार भविष्यात घडल्यास या प्रमाणे मुर्दाड समाजाची वृत्ती न बाळगता एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य बजावून या भामट्या चोरांना वेळीच लगाम लावणे आवश्यक आहे.