हिंगोलीनंतर कल्याणमध्येही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, मतमोजणीला उशीर!
जून ०४, २०२४
0
महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळत आहे. सत्तासंघर्षात काय होणार? कुणाच्या बाजूने निकाल लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असता हिंगोलीमध्ये मतमोजणीला सुरवात होण्याआधीच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली. याशिवाय, कल्याण येथेही ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झल्याचे समजत आहे.
राज्यभरात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. परंतु, हिंगोलीत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतमोजणीला उशीर झाला. हिंगोली विधानसभेतील खिडकी बूथ क्रमांक ०८ खोली क्रमांक ०१ मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मशीन ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, ईव्हीएम मशीनमध्ये मतदान झालेले दिसत आहे. परंतु, कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले, हे दाखवत नाही. सर्व मतमोजणी झाल्यानंतर या मशीनमधील बॅलेट पेपरचे मतदान मोजले जाईल, असे सांगण्यात आले. हिंगोलीत शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत लढत सुरू आहे. कल्याण येथेही ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणीला उशीर झाला आहे.
हिंगोली मतदारसंघात यंदा ६२.५४ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नागेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेने बाबूराव कदम-कोहळीकर यांना मैदानात उतरवले आहे. कुणाच्या बाजूने निकाल लागणार, हे काही तासातंच स्पष्ट होईल. कल्याण मतदारसंघात ४१.७० टक्के मतदान झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतमोजणी होत असताना महाराष्ट्रात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी भारत गट यांच्यात निकराची लढत होत आहे. राज्यात इंडिया आघाडी सध्या २५ जागांवर आघाडीवर आहे. तर, एनडीए २१ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी यंदा सात टप्प्यात मतदान झाले. जनतेने कोणाच्या बाजूने कल दिला, हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.