घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश
मे ०७, २०२४
0
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची यावर्षी ८ फेब्रुवारी रोजी फेसबूक लाइव्ह करत मॉरिस नोरोन्हा याने हत्या केली होती. याहत्येप्रकरणी आज मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी घोसाळकरांच्या हत्येसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, असे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आरोपपत्रात दाखल करण्यात आलेलं सर्व कुटुंबियांना दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. तसेच हत्या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज गुगल टाईमनुसार ताब्यात घेतल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
घोसाळकरांच्या कुटूंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आरोप केला की, आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांची असताना ६० दिवसांतच मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. तसेच तक्रारदार आणि मृत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचं म्हणणंही नीट ऐकून घेतलं नाही. दुसरीकडे तक्रारदार दररोज काहीतरी नवीन कागदपत्रे सादर करत असल्याची तक्रार पोलिसांनी न्यायालयात केली.त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून पोलीस विरुद्ध तक्रारदार असा वाद निर्माण झाला आहे.
अभिषेकच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी हत्या प्रकरणाच्या तपासावर व पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली व पुढील सुनावणी जून महिन्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
मुंबईतील दहिसरमध्ये राहणारा सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली होती. तसेच राजकीय वातावरणही तापलं होतं. या हत्येच्या चार महिन्यानंतरही या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली नाही.