धाराशिवमध्ये मतदान केंद्रावर चाकूने हल्ला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू
मे ०७, २०२४
0
धाराशिव : आज लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशातील एकूण 94 लोकसभेच्या जागांवर आज मतदान केले जात आहे. महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये मात्र निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले आहे. मतदान केंद्रावरच चाकूने हल्ला करण्यात आलेला असून यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही भांडणाची घटना घडली. मतदान केंद्रावर मतदान करण्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. मतदान केंद्रावरच चाकू उगारण्यात आला. या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. समाधान पाटील असे या हल्ल्यामध्ये मृत तरुणाचं नाव आहे. तर चाकूने हल्ला केलेल्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असे आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मतदार आणण्यावरून वाद आणि हत्या
भूम तालुक्यातील पाटसांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या परिसरात हा वाद झाला. मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यवसन मोठ्या भांडणात झालं. त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असं आहे. चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर या हल्ल्यात इतर तीन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हा वाद चांगलाच धुमसत होता. आता मतदानाच्या दिवशी त्याचं निमित्त झालं आणि त्यातून ही हत्या झाली. तालुका रुग्णालयात समाधान पाटीलचा मृतदेह ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे भेट देणार असल्याची माहिती आहे.