अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे
मे ०१, २०२४
0
वसईजवळ नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका अल्वपयीन मुलीवर बलात्कार करून तिला दोनदा गर्भवती केल्याचे तसेच तिच्या पहिल्या बाळाची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक वर्षापूर्वी तरुणीवर बलात्कार झाला होता. त्यातून झालेल्या बाळाची विक्री केली होती. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात पीडितेवर बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांसह, रुग्णालयातील डॉक्टर तसेच माजी नगरसेविकेसह १६ जणांवर बलात्कार व पोक्सोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडिता १७ वर्षाची आहे. तिचे दोन वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली होती. मात्र प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. परिसरातील माजी नगरसेविकेच्या मदतीने हे प्रकरण मिटवले होते. यासाठी नगरसेविकेने प्रियकराकडून ४ लाख रुपये उकळले होते. हे पैसे माजी नगरसेविका, पीडितेचे आई वडील, मध्यस्त व्यक्तीने परस्परात वाटून घेतले होते. त्यानंतर पीडितेची नालासोपाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात प्रसूती करून तिच्या बाळाची विक्री करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
त्यानंतर तिच्या पालकांनी घर बदलून दुसरीकडे रहायला गेले होते. तेथेही एका तरुणाने तिला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याच्यापासूनही ती गर्भवती राहिली. दुसऱ्यावेळी तिची प्रसूती अमरावती येथील एका रुग्णालयात झाली. दुसऱ्या तरुणानेही लग्नाचा विषय काढताच हात वर केले. त्यानंतर पीडितेने एका महिला सामाजिक कार्यकर्त्यासह आचोळे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
दोन प्रियकरांसह १६ जणांविरोधात गुन्हा -
पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नालासोपारा येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स, मुलीवर बलात्कार करणारे दोन्ही तरूण, मुलीचे आई वडील, माजी नगरसेविका, तसेच मुलीची विक्री करणारी महिला अशा एकूण १६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. बलात्कार, अपहरण, नवजात बाळाचा त्याग करणे, अपहरण आदींच्या कलम ३७६, ३७६ (२) (एन) ३१७, ३६३, ३७१ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलम ४, ६, ७, १२, २१ सह लहान मुलांच्या ज्युवेनाईल ॲक्ट २०१५ च्या कलम ७५ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पीडिता अल्वपयीन असतानाही दोन रुग्णालयांच्या डॉक्टरांनी तिची प्रसूती केली आणि पोलिसांना कळवले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या आई वडिलांनी मुलगी अल्पवयीन असतानाही बाळाची विक्री करण्यास संमती दर्शवली होती म्हणून त्यांना देखील आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Tags