ठाण्यात गुरुवारी 'या' भागांत २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
एप्रिल २४, २०२४
0
ठाण्यात गुरुवारी (२५ एप्रिल २०२४) देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा बंद होत असल्याने ठाणेकरांना पाणी जपून वापरावे लागेल. ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवारी (२५ एप्रिल २०२४) सकाळी ०९.०० ते शुक्रवारी (२६ एप्रिल २०२४) सकाळी ०९.०० वाजेपर्यत २४ तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. १ व २, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलिस लाईन परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन.के.टी. कॉलेज परिसर, खारकर आळी, पोलिस हायस्कूलच्या काही भागात पाणीपुरवठा २४ तास पूर्णपणे बंद राहील. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाहीस सुरुवात केली आहे. समाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू केली.
महापालिका क्षेत्रात ठाणे रेल्वे स्थानक, नौपाडा- आईस फॅक्टरी, तीन हात नाका- सिग्नल या तीन ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आली. यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्था करणार आहे.