गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी यांच्यासारखं खंबीर नेतृत्व हवं आहे. त्यांच्यासाठी महायुतीला पाठिंब देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावं असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या भाषणामुळं एक वेगळाच संभ्रम सध्या निर्माण झाला आहे.
मनसेचा महायुतीला पाठिंबा सक्रिय असेल का, राज ठाकरे हे भाजप आणि शिंदे व पवार गटाच्या उमेदवारांसाठी सभा घेणार का, याविषयी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे हे फर्डे वक्ते आहेत. राजकीय वातावरण बदलण्याची, आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्याची व तो पटवून देण्याची कमालीची हातोटी त्यांच्याकडं आहे. ते प्रचारात उतरल्यास महायुतीला मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा काही शहरात फायदा होऊ शकतो. मात्र, राज ठाकरे हे प्रत्यक्ष सभा घेणार का याबाबत साशंकता आहे.
डोंबिवलीत राजीनामा सत्र..डोंबिवलीतील मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दवते आणि प्रथमेश जोगळेकर विभाग अध्यक्ष, निखिल साबळे शाखा अध्यक्ष तसेच काही कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दवते यांनी सांगितलं की, मनसेच्या सोशल मिडिया पेजवर राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असे स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांनी तसं कोणतंही सुतोवाच केलेलं नाही. त्यातच भाजपप्रणित महायुतीला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या घोषणेनंतर मनसेमध्ये मोठी नाराजी आहे. आपल्या पक्षानं निवडणूक न लढणं समजू शकतो. मात्र आपण निवडणूक न लढता इतरांना पाठिंबा का द्यायचा, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. सोशल मीडियातही राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांची चर्चा आहे.