महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या १७ उमेदवारांची यादी तयार; कोणाला मिळणार आव्हान, वाचा..

0

महाविकास आघाडीमधील पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना (ठाकरे गट) 20 जागा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि कॉंग्रेस 16 अशा जागा लढविणार आहे. यातील शिवसेना ठाकरे गटाने 20 जागांपैकी 17 जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. तर, 3 जागांवर अद्याप तिढा आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाल्यांनतर या उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

लोकसभेच्या 20 जागा लढविणार

शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 20 जागा लढविण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, पालघर, रायगड, रत्नागिरी–सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, मावळ, शिर्डी, सांगली, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि यवतमाळ या जागांचा समावेश आहे. या जागांपैकी कल्याण-डोंबिवली, पालघर आणि मुंबईतील एका मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाले नाहीत असे या सूत्रांनी सांगितले.

या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी?

शिवसेना ठाकरे गटातील दक्षिण मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत, ठाणे मतदारसंघाचे राजन विचारे, उस्मानाबाद मतदारसंघाचे ओमराजे निंबाळकर, परभणी मतदारसंघाचे संजय (बंडू) जाधव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे असे या सूत्रांनी सांगितले.

या 12 उमेदवारांची कुणाशी लढत होण्याची शक्यता?

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात अनिल देसाई यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे. येथे शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. मुंबई ईशान्य मतदारसंघात भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात संजय दिना पाटील यांना संधी दिली जाऊ शकते.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर

उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केलीय. येथून विनोद घोसाळकर हे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा सामना MIM चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि भाजपचे भागवत कराड यांच्याशी होईल.

बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडकर यांना संधी

बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. येथे शिंदे गटाचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे विद्यमान खासदार आहेत. यवतमाळ मतदारसंघातून संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची माहिती आहे. येथे शिंदे गटाच्या भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत.

शिर्डी मतदार संघातून ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांची लढत शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी होईल. नाशिक मतदारसंघातून विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा आहे. येथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याशी त्यांची लढत होण्याची शक्यता आहे.

रायगडमधून शिवसेनेचा जुना चेहरा अनंत गीते यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजीतदादा गट) सुनील तटकरे विरुद्ध गीते असा सामना रंगलेला दिसेल. हिंगोली मतदारसंघातून ठाकरे गटाने नागेश आष्टीकर यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आहे. सध्या येथे शिंदे गटाचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत.

सांगलीमधून कुस्तीपटू चंद्रहास पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळणार आहे. चंद्रहास पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. येथे त्यांना भाजपचे संजय काका पाटील यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. मावळ मतदारसंघातून संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. येथे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे ही विद्यमान खासदार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)