नमो महारोजगार मेळाव्यात महाझोल? ४३ हजार पैकी ३० हजार ट्रेनी पदे
मार्च ०२, २०२४
0
मोठी जाहीरातबाजी आणि गाजावाजा करून बारामती येथे २ आणि ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यात मोठा झोल असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या मेळाव्यातून ४३ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे सरकारकडून सांगितले जात असले, तरी यातील ३० हजार पदे ही ट्रेनी असून प्रत्यक्षात नोकऱ्या नाहीत. या मेळाव्याची जबाबदारी प्लेसमेंट एजन्सीवर देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांमधील रोजगारामध्ये बाह्य यंत्रणेचा शिरकाव सरकारच्या कृपेने झाला असून बेरोजगार तरुणांच्या भावनांशी सरकार खेळत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरीची संधी शोधणाऱ्या युवकांसाठी बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा भरविण्यात आला आहे. या मेळाव्यात तब्बल ४३ हजार बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, आज होणाऱ्या या रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात ५० ते ५५ हजार जणांना रोजगार दिला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. राज्याच्या कौशल्य विकास विभागाकडून पत्रकार परिषदेत ४५ हजार जागा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ४३ हजार जागा उपलब्ध असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दरम्यान, यातील ३० हजार जागा या ट्रेनी पदाच्या म्हणजे शिकाऊ उमेदवारांसाठी आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या नमो महारोजगार मेळाव्यावर संशय व्यक्त केला आहे.
शिकाऊ कामगार किंवा कर्मचारी म्हणून या जागा असून त्यामधून तरुणांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भोसरी येथील Ligmus Pvt. Ltd. कंपनीमध्ये १५ हजार ट्रेनी घेणार आहे. तर बारामतीची Giles Pvt. Ltd. कंपनी १ हजार ट्रेनी घेणार आहे. एवढा मोठ्या प्रमाणावर ट्रेनी घेणाऱ्या या दोन्ही कंपन्यांबाबत इंटरनेटवर काही माहिती सापडली नाही. कदाचित स्पेलिंग मिस्टेक असू शकते. रोजगार मेळाव्यात नाव दिलेली Giles प्रा. लि. कंपनी ही इंटरनेटवर Gils प्रा. लि. या नावाने सापडली आहे. आश्चर्य म्हणजे या कंपनीच्या सर्व नऊ महिला-पुरुष संचालकांची नावे डी. विल्यमसन आहेत, असे कुंभार यांनी सांगितले. तरुणाची ही फसवणूक असल्याचे देखील ते म्हणाले.