विरार-पालघर अंतर आता १५ मिनिटांत गाठता येणार, सुरू होणार रो-रो सेवा

0

वसई-भाईंदरनंतर आता पालघर ते विरारपर्यंत आणखी एक रो-रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. ही सेवा सरू होताच पालघरवरून विरारचे अंतर केवळ १५ मिनिटांत गाठता येणार आहे. सध्या हे अंतर पार करायला रस्तेमार्गाने १ ते दीड तासांचा वेळ लागतो. आता समुद्रीमार्गाने प्रवासाचा वेळ वाचणार आहे तसेच इंधनाचीही बचत होणार आहे. वसई-विरारकरांना रस्ते मार्गाने पालघर गाठण्यासाठी एक ते दीड तासांचे अंतर पार करावे लागते. अहमदाबाद महामार्गाने पालघरला जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. तसेच, वाहतूक कोंडीत अडकल्यास वेळ अधिक लागू शकतो. विरार ते पालघर रोरो सेवेसाठी विरारमधील नारंगी जेट्टी तयार झाली आहे. तर, पालघरमधील खारवाडेश्वर रो रो जेट्टी उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्या आहेत. या जेट्टीसाठी सरकारने २२३.६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

विरार ते पालघर साधारण ६० किमी आहे. तर, वसई ते पालघर रस्ते मार्ग ५६.१ किमी आहे. मात्र, जलमार्गे हे अंतर केवळ ३ किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळं वेळेची बचत होणार आहे. रस्ते मार्गाबरोबरच रेल्वेने पालघरला जाण्यासाठीही तितकाच वेळ लागतो. त्यात लोकल सेवेची कमतरता असल्याने विरार ते पालघर हा जलमार्ग नागरिकांसाठी तसेच रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीचा ठरू शकतो.

दरम्यान वसई विरार व मीरा भाईंदर शहरादरम्यान रो रो सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)