डोंबिवली : मराठी भाषा दिनानिमित्त राज्यात ठीक ठिकाणी कार्यक्रम आणि स्वाक्षरी मोहिमांचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करून मराठी भाषेचे महत्व आणि तिच्या संवर्धनाची गरज याबाबत पटवून देण्यात आले. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, ‘फक्त मराठी’, ‘मी मराठी’ असे संदेश देत मराठीमध्ये वेगवेगळ्या पण आकर्षक पद्धतीने स्वाक्षरी करत हजारो तरुणांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने डोंबिवली पूर्व स्थानका बाहेर ‘मी मराठी... स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास सुरुवात होताच नागरिकांनी मराठी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. स्वाक्षरीसाठी लावलेल्या मोठ्या फ्लेक्सवर मराठीतून स्वाक्षरी करण्यासाठी महाविद्यालयीन तरुण, तरुणी, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाला मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, विभाग अध्यक्ष रतिकेश गवळी, विशाल बढे, गणेश साळवी तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकारत उपस्थित होते.
मराठी भाषा दिनानिमित्ताने स्वाक्षरी मोहीम आम्ही आयोजित करत असून, दरवर्षी यासाठी प्रतिसाद वाढत आहे. आज संध्याकाळपर्यंत हजारो नागरिकांनी स्वाक्षरी केली. यामध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. नागरिकांनी त्यांचे अभिप्राय लिहून या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर वाढला पाहिजे, त्यासाठी मराठीतून स्वाक्षरी करण्याचेही प्रमाण वाढावे, असा आमचा हेतू आहे.रतिकेश गवळी
मनसेचे विभाग अध्यक्ष