पुणे नगर रहिवासी उत्कर्ष संस्थेचा कौटुंबिक स्नेहसंमेलन व वधू-वर मार्गदर्शन सोहळा कल्याण येथे संपन्न

0

रविवार कल्याण डोंबिवली स्थित पुणे ॲड. नगर रहिवासी उत्कर्ष संस्थेचा कौटुंबिक स्नेहसंमेलन आणि वधु-वर परिचय व मार्गदर्शन मेळावा गीता हॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण पश्चिम येथे सकाळी ११:३० वाजता अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा पोलीस उपायुक्त गणेश गावडे, कल्याण परिमंडळ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, केडीएमसी चे सहाय्यक नगर रचनाकार स्वप्नील दळवी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक श्री. अरविंद पोटे, सौ. विजयाताई पोटे, श्री. सचिन पोटे, श्री. जे.सी.कटारिया, सौ. मायाताई कटारिया हे सर्व माजी नगरसेवक तसेच पुणे नगर परिसरातील यशस्वी उद्योजक असलेले श्री. बिपिन पोटे सर, श्री. मनोज डुंबरे, श्री. विजय डुंबरे, श्री. विकास कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. राम औटी यांनी केले व उपस्थित त्यांना संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व्यवस्थित रीत्या समजावून सांगितली. प्रमुख पाहुणे व संस्थेचे मार्गदर्शक यांचे स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे संयोजक व कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर पुणे नगर रहिवासी उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप नलावडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट करताना पुढील एक महिन्याच्या कालावधीत पुणे नगर रहिवासी उत्कर्ष संस्थेचे धर्मदाय आयुक्त ठाणे यांच्याकडे रजिस्ट्रेशन होणार असल्याचे उपस्थितांना सांगितले त्यास संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गणेश गावडे साहेब यांनी ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त आदरणीय श्री. आशुतोष डुंबरे साहेब (भा.पो.से.) यांनी सदर पुणे नगर रहिवाशी उत्कर्ष संस्था आयोजित कुटुंब स्नेहसंमेलन आणि वधू-वर परिचय मेळाव्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याचे आवर्जून सांगितले.

यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना गावडे यांनी नोकरी व व्यवसाय निमित्त आपले गाव सोडून शहरांमध्ये स्थिरस्थावर झालेल्या कुटुंबांना त्यांच्या मूळ गावापासून दूर असल्यामुळे विवाह जमविण्यामध्ये येणाऱ्या अडचणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे दूर होणार असल्यामुळे या कार्यक्रम आयोजनाचे मनापासून कौतुक केले, तसेच सदर कार्यक्रम हा अगदी घरचा असल्यामुळे अतिशय आपुलकीने कार्यक्रमास हजेरी लावल्याचे सांगितले. त्याचबरोबर पुणे नगर रहिवासी संस्थे सोबतच सर्व रहिवाशांना देखील कोणत्याही वैयक्तिक अथवा सामाजिक वा प्रशासकीय बाबी मध्ये अडचण आल्यास आपणाकडून १००% सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

वधू-वरांसाठी सौ. शारदा वाळुंज व सौ. तृप्ती पाटील यांनी वैवाहिक जीवनावर अतिशय सुंदर आणि मार्मिक असे मार्गदर्शन केले.

ज्योतिषशास्त्री सौ. शारदा वाळुंज यांनी ज्योतिष शास्त्र तसेच ग्रह, तारे कुंडली आणि विवाह योग याबद्दलचे आपल्या जीवनाशी असलेले सहसंबंध शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय सोप्या शब्दात उपस्थितांना समजावून सांगून आपली जन्मवेळ आणि कुंडली याचेही महत्व अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितले. सौ. तृप्ती पाटील यांनी आजच्या युवक-युवतींच्या आयुष्यातील विवाह आणि त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय, तसेच वधू-वरांचे, आई-वडील यांचे त्यांच्या आयुष्यातील स्थान, त्यात कालापरत्वे होणारे बदल आणि त्यावरील उपाय अतिशय उत्तमरित्या उपस्थितांना पटवून दिले.

या समारंभातील विशेष बाब म्हणजे राजमाता जिजाऊ महिला पतपेढीच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले गेले होते. यावेळी खजिनदार सौ. विद्या ताई चौधरी, संचालक सौ. कल्पनाताईं तांबे नी सर्वच उपस्थित महिलांना हळदी व कुंकवाने औक्षण करून सौभाग्याचे वाण म्हणून छानसे गुळाचे पॅकेट आपुलकीने भेट दिले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. जी. जी. लोखंडे यांनी आभार प्रदर्शन करताना सदर कार्यक्रम नियोजन व आयोजन करताना सर्व कमिटी आणि संयोजकांनी घेतलेल्या मेहनतीची उपस्थितांना जाणीव करून दिली व कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपला हे जाहीर केले.

यानंतर वधु-वर परिचय मेळावा सुरू करण्यात आला, जवळपास ५० वधू-वरांनी या मेळाव्यामध्ये नोंदणी केली होती. याप्रकारे वधू-वर पहिला परिचय मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमास पुणे नगर रहिवासी उत्कर्ष संस्थेच्या सर्व संयोजकांनी अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य करून कार्यक्रम पार पडण्यास मदत केली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपसचिव श्री. तानाजी सहाणे सरांनी राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दामिनी डुंबरे-नलावडे आणि कुमार तेजस जगताप यांनी अतिशय उत्तम रित्या केले.

पुणे नगर रहिवाशी उत्कर्ष संस्थेचे खजिनदार श्री. प्रल्हाद डोंगरे व संस्थेचे संचालक व संयोजक सर्व श्री. दशरथ दांगट, श्री. भाऊसाहेब नाईक, सौ. राणी करंडे, सौ. सोनाली औटी, श्री. महेंद्र हडवळे, श्री. सचिन नलावडे, श्री. नामदेव चवरे, श्री.संपत डेरे, श्री.अरूण चौधरी, श्री.रविंद्र चौधरी, श्री. मचिंद्र डोके, श्री. सुनील सहाणे, श्री. गुंजाळ सर, श्री.अशोक पोटे सर, सौ.वंदना कुर्‍हाडे, सौ. मंदा ताम्हाणे यांचे या कार्यक्रमास विशेष असे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)