विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर
डिसेंबर १३, २०२३
0
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अवघ्या राज्याचे दैवत आहे. या ठिकाणी आषाढी वारी निमित्त आणि रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेऊन झाल्यावर येथील प्रसादाचा लाडू देखील घेऊन जातात. मात्र, या प्रसादाबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रसादाचा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाले आहे. लेखापरीक्षणाच्या अहवालात ही बाब उघड झाली असून हा अहवाल अधिवेशनात मांडण्यात आला आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू हा निकृष्ट असल्याचे समोर आहे आहे. जो बचत गट हा लाडू बनवतो त्या ठिकाणीची जागा ही अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी वापरण्यात येणारे कापड देखील अस्वच्छ असल्याचे अहवालात मांडण्यात आले आहे.
लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे घटक आणि पाकीटावर असलेले घटक हे भिन्न आहेत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट कंत्राटामध्ये नमूद असतांना प्रत्यक्ष मात्र, सरकीचे तेल वापरले जाते. हा लाडू भाविकांना २० रुपयांत विकला जातो. मात्र, या लाडू रूपी प्रसादाच्या माध्यमांतून भक्तांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. बचत गटाबरोबर मंदिर समितीचीसुद्धा याला जबाबदर असल्याचा ठपका लेखापरीक्षण करणाऱ्या पुण्याच्या ‘बीएसजी अँड असोसिएट्स’ने नोंदवला आहे.
दरम्यान या बाबत श्री विठृटल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले, हा लाडू राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रमाणित करून घेतला जाणार आहे. प्रसादामध्ये ज्या काही त्रुटी असल्याचे अहवालात नोंदवल्या आहेत, त्या दुरस्त करून भाविकांना चांगला लाडू दिला जाईल, असे देखील शेळके म्हणाले.
Tags