विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीला शिक्षकांचा विरोध; अॅप गैरसोयीचे असल्याचे दिले कारण
डिसेंबर १३, २०२३
0
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये १ डिसेंबर पासून ऑनलाइन हजेरी घेण्यास सुरवात झाली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीचे आणि गैरसोईचे कारण देत ही ऑनलाइन हजेरी घेण्यास शिक्षकांनी नापसंती दर्शवली आहे.
राज्यात सर्व शाळांमध्ये फोनवरुन ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच, अनुदानित शाळांना ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवन्यास सुरुवात झाली आहे. या साठी शिक्षकांना स्विफ्टचॅट या मोबाइल ॲपद्वारे वर्गात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन पद्धतीने नोंदवायला सुरुवात केली आहे. या प्रयोगामुळे वर्गात प्रत्यक्षात किती विद्यार्थी उपस्थित असतात, याची माहिती उपलब्ध होत आहे.
दरम्यान, या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होणार असे कारण देण्यात आले होते. मात्र, ही योजना सुरू होईल १० दिवस उलटत नाही तर शिक्षकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील २६ हजार ७८६ शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवली.
शिक्षकांनी सांगितले की शिक्षकांमागील हे एक अतिरिक्त कार्य आहे. हजेरीसाठी देण्यात आलेले अॅप हे केवळ वास्तविक वेळेची उपस्थिती नोंदवते. शिक्षकांनी सांगितले की जर एखाद्या विशिष्ट दिवशी यात तांत्रिक बिघाड झाल्यास अथवा इंटरनेट नसल्यास संपूर्ण वर्ग गैरहजर असल्याचे दाखवते. तसेच या नंतर यात हजेरी लावण्याची देखील तरतूद नाही. या मुळे हे तंत्रज्ञान सोईचे नाही असे शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या वर शिक्षण विभाग आता काय भूमिका घेणार या कडे लक्ष लागून आहे.