'हिंदुहृदयसम्राट एकनाथ शिंदें' बॅनरवरून नवा वाद... ठाकरे गटाची जळजळीत टीका

0

महाराष्ट्राच्या राजकारणात आता एका बॅनरवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या एकनाथ शिंदे यांचा उल्लेख तेथे लावण्यात आलेल्या बॅनरवर हिंदूहृदयसम्राट असा केल्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप उमेदवाराच्या रॅली आणि प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा केल्याने ठाकरे गटाने खरमरीत टीका केली आहे. या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुहृदयसम्राट उल्लेखावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की,बाप चोर, पक्ष चोर, आता हिंदुहृदयसम्राट पदवीही चोरली. किती निर्लज्जपणा? त्याचा कळस गाठलाय, किती मास्क लावून फिरणार? किती दिखावा करणार, यापेक्षा एखादी चांगली एक्टिंग करा.जी तुम्ही करताय. हे सगळे काहीही केले तरी गद्दारीचा शिक्का माथ्यावर लागलाय तो पुसला जाणार नाही. ३१ डिसेंबरनंतर हे सरकार जाणार म्हणजे जाणार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात केला आहे.

हिंदूहृदयसम्राट असा शिंदेंचा उल्लेख केल्यानं खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. सत्तेसाठी बेईमानी करणा-यांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असावी. बाळासाहेबांनी सत्तेसाठी बेईमानी केलेली नाही. एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट म्हणून काय असं महान कार्य केलंय...? हे त्यांनीच सांगावं. बाळासाहेबांचं कार्य आम्ही पाहिलं आहे.शिंदेंनीस्वत:ला कितीही पदव्या लावून घेतल्या तरी त्याचा फार काही फरक पडत नाही. राजस्थान भाजपला महाराष्ट्रात काय चालले आहे, हे कुठे ठाऊक आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन प्रचाराला गेले असतील. महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील.अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)