मेळाव्यांनंतर परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या वाहनांचा भीषण अपघात
ऑक्टोबर २५, २०२३
0
शहापूर : शिंदे गटाच्या दासऱ्या मेळाव्यासाठी आलेले काही कार्यकर्ते हे घरी माघारी जात असतांना त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर मुंबई आग्रा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
काल एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. या साठी मोठ्या प्रमाणात राज्यातून कार्यकर्ते आले होते. औरंगाबाद येथून देखील काही करकर्ते तीन ते चार बसमध्ये मुंबईत आले होते. मेळावा संपवून हे कार्यकर्ते पुन्हा माघारी जात होते. दरम्यान, मुंबई आग्रा मार्गावर त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडकला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बस देखील एकमेकांवर धडकल्या. या भीषण अपघातात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळला. इतर दोन बसचंही या अपघातात मोठे नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर काचांचा मोठा खच पडला होता.
या भीषण अपघातात ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. काही जण गंभीर आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आले असून येथील वाहतुक सुरुळीत करण्याचे काम सुरू आहे.