पुणे : पुण्यातील ससुन रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. ललित पाटील यांना मुंबई पोलिसांनी मुंबईत आणले आहे. त्याला अंधेरी कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. दरम्यान, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतांना त्याने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्याने मोठे गौप्यस्फोट केले. ललित पाटील म्हणाला,' मी ससुन मधून पळालो नाही तर मला पळवले गेले. मी पत्रकारांशी लवकरच बोलीन. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे मी सगळं सांगणार आहे.
ससुन रुग्णालयात असतांना ड्रग माफिया ललित पाटीलला हा तेथून ड्रग्स तस्करीचे रॅकेट चालवत होता. ससुन रुग्णालयापुढे मोठे ड्रग्स सापडल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर ललित पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता. गेल्या १५ दिवसांपासूंन मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिस ललित पाटील याच्या मागावर होते. मात्र, ललित पाटील हा पोलिसांना गुंगारा देत होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तसेच राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू होते. दरम्यान ललित पाटील हा बंगलोर येथे लपून असल्याची माहिती मुंबई आणि पुणे पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला आज सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याला साकीनाका पोलिसांनी मुंबईत आणले आहे. आज त्याला अंधेरी कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. त्याला पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतांना एका वृत्तवाहिनीने ललित पाटील याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने वरील गौप्यस्फोट केला.
ललित पाटील फरार झाल्यावर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. ललित पाटील याचे राजकीय नेत्यांसोबत असलेले फोटो देखील व्हायरल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटील आणि मंत्री दादा भुसे यांचा संबध असल्याचा गौप्य स्फोट केला होता. दादा भुसे यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यात आणखी दोन नेत्यांचा हात असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. तर दादा भुसे यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहिती असून त्यांचे आरोप बिनबुडाचे आहे. त्यात तथ्य नाही असे म्हटले होते. चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचे दादा भुसे म्हणाले होते. दरम्यान, आता ललित पाटील याने वरील आरोप केल्याने गूढ वाढले आहे. ललित पाटील कुणाचे नाव घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.