'ड्रीम ११' मधून करोडपती झालेल्या पीएसआयची होणार चौकशी; कारवाई करण्याचे आयुक्तांचे संकेत
ऑक्टोबर १२, २०२३
0
पुणे : देशात सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा फिवर सुरू असतांना पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील पोलिस उपनिरीक्ष सोमनाथ झेंडे हे ड्रीम ११ या ऑनलाइन जुगार खेळामुळे रातोरात करोडपती झाले. त्यांना यात चक्क दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदात असतांना आता त्यांचा आनंद मावळणार आहे. त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नितीन माने यांनी दिले आहे. या प्रकरणी भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार केला. त्यानंतर काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
देशात सध्या क्रिकेट विश्वचषकाची धूम सुरू आहे. यात अनेक ऑनलाइन जुगार खेळ देखील सर्रास खेळले जात आहे. या माध्यमांतून अनेक जण आपले नशीब आजमावू पाहत आहे. ड्रीम ११ हा असाच ऑनलाइन गेम असून याच्या माध्यमातून आपला संघ बनवून अनेक जण आपले नशीब आजमावू पाहत आहे. दरम्यान, या गेमवर बंदीची मागणी होत असतांना पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील एका पोलिस उपनिरीक्षक सोमनात झेंडे यांचे नशीब या खेळामुळे पालटले होते. त्यांनी ड्रीम ११ वर आपला संघ बनवत केवळ ४९ रुपयांच्या मोबदल्यात दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले होते. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनवर टीम तयार होती. यातूनच त्यांना ही दीड कोटीची लॉटरी लागली. या घटनेमुळे सोमनाथ झेंडे हे रातोरात प्रसिद्ध देखील झाले. मात्र, आता त्यांना ऑनलाइन जुगार खेळणे अंगलट येणार आहे.
भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. यावर पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून त्यांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली आहे. तपासांती त्यांच्यावर कारवाई करायची का नाही ते हे देखील ठरवले जाईल असे देखील त्यांनी महटले आहे.