मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज पहाटे अब्दुल वाहिद शेख यांच्या विक्रोळी येथील निवासस्थानावर छापा टाकला. वाहिद शेख यांची ७/११ मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार वाहिद शेख हा 'इनोसंट नेटवर्क' ही संस्था चालवत असून तो पीएफआयशी संबंधित होता.
एनआयएने पीएफआयचे मॉड्यूल नष्ट करण्यासाठी आज सकाळपासून महाराष्ट्र, यूपी, राजस्थान, तामिळनाडू आणि दिल्लीसाह विविध राज्यात धाडी टाकल्या. एनआयएने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील पाच ठिकाणी आज सकाळी छापे टाकले. मुंबईच्या विक्रोळी येथील अब्दुल वाहिद शेखच्या निवासस्थानावर देखील छापेमारी करण्यात आली. या सोबतच एनआयएच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आज मोठी कारवाई केली.
एनआयएने आज देशभरात पीएफआय या संघनेशी संबंधित ठिकाणांवर जोरदार छापेमारी केली आहे. विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेख यांच्या घरी एनआयएचे पथक पहाटे 5 वाजताच पोहचले. मात्र वाहिद शेख हा दरवाजा उघडत नव्हता. जो पर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तो पर्यंत दरवाजा उघडनार नाही असा पवित्रा त्याने घेतला होता. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्याच्या घरात झाडाझडती सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
अब्दुल वाहित हा 2006मध्ये झालेल्या ट्रेन ब्लास्ट स्फोटातील आरोपी होता. त्याला अटकही करण्यात आली होती. त्याचा पीएफआय या संघटनेशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ट्रायल कोर्टाने त्याची सर्व गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आज एनआयएने पहाटेच त्याच्या घरी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या विक्रोळी येथील घराच्या बाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बंदी असलेली संघटना
एनआयएने आज देशभरातील सहा राज्यात छापेमारी केली आहे. राजस्थानच्या टोंक, कोटा आणि गंगापूर येथे आणि हौज काजी, बलिमारन येथेही छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीत ही छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत एनआयएच्या हाती बरंच घबाड लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबर 2022मध्ये केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातलेली आहे. दहशतवादी कारवाया करत असल्याच्या आरोपावरून ही बंदी घालण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयचे कार्यकर्त्यांनी अनेक नव्या नावांनी संस्था तयार केल्या असून त्याद्वारे अनेक समाजविघातक कारवाया करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या द्वारे PFI पुन्हा नव्याने कार्यरत करण्याचा डाव असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या अनेक संशयास्पद कारवायावर एनआयएचे लक्ष आहे. या माध्यमातून PFI साठी निधी उभारणी केली जात असल्याच्या संशयामुळे NIA ने आज केलेल्या छापेमारीत वेगवेगळ्या ठिकाणांहून अंदाजे ७ ते १० व्यक्तींना अटक केली आहे.