मराठा आरक्षणावर अखेर मोदी बोलले, शिंदे-फडणवीसांना काय सल्ला दिला?
ऑक्टोबर २८, २०२३
0
Maratha Reservation :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा संघटना आक्रमक होत असल्याचं दिसून येत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला आहे. शिंदे-फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता पीएम मोदी यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तूर्त हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकार या प्रकरणात पडणार नसून मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य पातळीवरच सोडवण्याचा सल्ला पीएम मोदी यांनी शिंदे-फडणवीसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे. त्यामुळं आता राज्यातील मराठा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केल्याने शिंदे-फडणवीस सरकार मोठ्या राजकीय कोंडीत सापडलं आहे.
प्रमुख आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश होणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. उपोषण सुरू असताना आंतरवाली सराटीत वैद्यकीय पथक पोहचलं होतं, परंतु कोणतीही वैद्यकीय मदत अथवा अन्न-पाणी घेण्यास मनोज जरांगे पाटलांनी नकार दिला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर आले असता त्यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने मनोज जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.