राज्यातील खराब हवेची सरकारकडून गंभीर दखल, प्रदूषण रोखण्यासाठी नवी नियमावली

0

मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी दिवसेंदिवस खालावत असून राज्यातही तीच परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेनं प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर आता राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागानं तब्बल ३१ गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

धुलीकण आणि धुरक्यामुळं मुंबईतील हवा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषण वाढलं आहे. शहरात मोठ्या संख्येनं सुरू असलेली बांधकामं यासाठी प्रामुख्यानं कारणीभूत आहेत. त्यामुळं सरकारनं बहुतेक सूचना बांधकाम क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत.

राज्य पर्यावरण विभागाच्या गाइडलाइन्स पुढीलप्रमाणे

बांधकाम सुरू असलेल्या सर्व इमारतींना चारी बाजूंनी ओल्या हिरव्या कपड्यानं बंदिस्त करावं.

महापालिका क्षेत्रात ५० मीटर उंचीचं बांधकाम जिथं सुरू असेल, त्या भोवती किमान २५ फूट उची पत्रे उभारावेत. महापालिकेच्या हद्दीबाहेरील क्षेत्रात किमान २० फूट उंच पत्र्यांचे कुंपण असावे.

पाडकाम सुरू असलेलं ठिकाण चारी बाजूंनी ओल्या कपड्यानं झाकून घ्यावं. हे पाडकाम सुरू असताना पाण्याची फवारणी करावी. बांधकाम साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग केलं जात असताना पाण्याची फवारणी करण्याची खात्री करावी.

बांधकाम साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग केलं जात असताना पाण्याची फवारणी करण्याची खात्री करावी.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुलीकण उडत असतात. अशा ठिकाणच्या मलब्यांवर पाण्याची फवारणी करत राहावी

बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी वाहनं पूर्णपणे झाकलेली असावीत. गळती टाळण्यासाठी वाहनं ओव्हरलोड करणं टाळावं.

बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणं गरजेचं आहे. प्रदूषणाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्वरित कारवाई व्हावी. महापालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तशी तपासणी करावी.

ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगची कामं बंदिस्त ठिकाणी करावी, हवेत धुलिकण उडल्यानंतर त्यावर पाण्याची फवारणी करत राहावी.

सर्व बांधकाम कर्मचाऱ्यांना संबंधितांनी गाॅगल्स, हेल्मेट उपलब्ध करून द्यावेत

पूल आणि उड्डाणपूलांसारख्या कामाच्या ठिकाणी किमान २० फुटांचं बॅरिकेडिंग असावं

जमिनीवरील मेट्रोची सर्व कामे २० फूट उंचीच्या बॅरिकेडिंगनं झाकली जावीत. बांधकामाची जागा ताडपत्री / ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या पाटाने झाकलेली असावी. स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलर्सचा वापर बांधकाम कामाच्या दरम्यान केलं जावं

बेकायदा डम्पिंग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वा आयुक्तांनी रात्रीच्या वेळी विशेष पथकं तैनात करावीत.

वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके तैनात करण्यात येतील. पथकाचं नेतृत्व प्रभाग/तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असेल. अंमलबजावणी पथक परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणी व्हिडिओग्राफी करेल. नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

स्प्रिंकलरच्या खरेदीसाठी १५ दिवसांची आणि स्मॉग गनच्या खरेदीसाठी ३० दिवसांची मुदत असेल. सर्व प्रकल्प प्रस्तावक/कंत्राटदारांनी मुदतीचं पालन करावं लागणार

बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहनं नियमांचं पालन करत नसल्यास आरटीओ किंवा पोलीस विभागाकडून ती जप्त करण्यात येतील.

साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडं वैध PUC प्रमाणपत्रं असावीत. अधिकार्‍यांच्या मागणीनुसार ती सादर केली जावीत.

वाहनांचे टायर धुण्याची सुविधा बांधकाम स्थळांच्या सर्व बाहेर पडण्याच्या ठिकाणी करावी. प्रमुख रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता केली जाते याची खात्री केली जाईल.

उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी असेल.

महानगरपालिका/नगरपरिषद क्षेत्रांतर्गत सर्व रस्त्यांना पक्के फूटपाथ दिले जातील

बेकरीमध्ये इलेक्ट्रिक ओव्हन, पीएनजी किंवा इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी निर्देश दिले जावेत

स्मशानभूमीच्या ठिकाणी पर्यावरणास अनुकूल अशी अंत्यसंस्कार पद्धती वापरली जावी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)