देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार?, भाजपच्या व्हायरल व्हिडिओमुळं चर्चांना उधाण
ऑक्टोबर २८, २०२३
0
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असतानाच आता राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भाजपाने एक्स हँडलवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' चा व्हिडिओ शेयर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईवर येत्या काही दिवसांत अंतिम निकाल येणार आहे. निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचं सूतोवाच भाजपच्या नव्या ट्वीटमधून देण्यात आले आहे. त्यामुळं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्र भाजपने अधिकृत एक्स खात्यावरून एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये 'मी पुन्हा येईन' या कवितेवर आधारीत देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. 'मी पु्न्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी', अशा आशयाचे कविता महाराष्ट्र भाजपने शेयर करत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीला वेग दिला आहे. त्यामुळं हे प्रकरण विरोधात गेल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं आता भाजपने शेयर केलेल्या व्हिडिओवरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काहीही आलबेल नसल्याच्या चर्चांना वेग आला आहे.