मुख्यमंत्र्यांच्या शपथेचा आदर; मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही

0

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण मध्येच थांबवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले व शपथ घेतली की, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ. यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे.

जरांगे पाटलांनी म्हटलं आहे की, तुम्ही मराठा आरक्षणासाठी शिवरायांसमोर शपथ घेतली, नतमस्तक झाला त्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण जोपर्यंत तुम्ही आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलं.

मराठा आरक्षणाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेली डेडलाईन २४ ऑक्टोबरला संपली असून त्यांनी सरकारला एक तासाचाही वाढीव वेळ न देता २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणावर मोठं विधान केलं. मात्र तरीही जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत.

जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री आपल्या शब्दाला पक्के आहेत. पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. ५० टक्क्यांच्यावर आरक्षण आम्हाला मान्य नाही. कारण ते टिकतच नाही. किती दिवस तुम्ही मराठा समाजावर अन्याय करणार आहात, किती दिवस माझ्या मराठा समाजाला त्रास सहन करावा लागणार आहे. हे आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला काही कामं नाहीत म्हणून आम्ही आलो नाही. निसर्ग साथ देत नाही, कर्ज काढून पोरांना शिकवतोय. पण आरक्षणामुळे त्याला नोकरी मिळत नाही, तो घरात सुशिक्षित बेरोजगार म्हणून राहतोय. आमच्या लेकरांचे आयुष्य पणाला लागलंय. सणाच्या दिवशी गोडधोड जेवायचं सोडून आम्ही आरक्षणासाठी लढतोय, ही आमची वेदना आहे. आमच्या किती पिढ्या बरबाद झाल्या. आमच्या कधीतरी कामाला यावं म्हणून तुम्हाला मोठं केलं आणि तुम्ही आता अशी भूमिका घेताय.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)