Nagpur Crime | भाडेकरू मुलीवर घरमालकाकडून बलात्कार
ऑक्टोबर १८, २०२३
0
नागपूर : घरात भाड्याने राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरमालकानेच मुलीवर बलात्कार केला असून पोलिसांनी या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. नागपुरातील सक्करदरा परिसरात ही घटना घडली असून यावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रतिक आसोले असं आरोपीचं नाव असून त्याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
नागपुरातील सक्करदऱ्यात एक कुटुंब आरोपी प्रतिक आसोलेच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत होतं. आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले असता आरोपीने संधी साधत मुलीचं तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पीडित मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतिक आसोले याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी प्रतिक आसोले हा अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून होता. तिचे आई-वडील बाहेर गेलेले असल्याचं समजताच त्याने घरात घुसून मुलीवर अत्याचार केल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.
आरोपी घरमालक प्रतिक आसोले हा भाड्याच्या खोलीतून हाकलून देईल, या भीतीने पीडितेने तातडीने तक्रार केली नाही. परंतु सतत होत असलेल्या त्रासाबद्दल कंटाळून पीडितेने घडलेला सारा प्रकार आई आणि शिक्षकांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांसह शिक्षकांनी मुलीला सोबत घेत पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वीच नागपुरात एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Tags