काय तरी मोठं घडतंय.. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची फडणवीसांसोबत ‘वर्षा’वर बैठक

0

मुंबई : मराठा आंदोलनाचा राज्यात भडका उडाला असून आंदोलकांकडून आमदारांची निवासस्थाने, पक्ष कार्यालये आणि व्यवसायांना टार्गेट केले जात आहे. आज मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचं दिसून आले. बीडमध्ये तर आज संध्याकाळी संचारबंदी लागू करण्यात आली. दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अशात आता सरकारवर दवाब वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री राज्यपाल रमेश बैस यांची अचानक भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे हे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. दोघांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानेतृत्त्वात भाजपच्या कोअर समितीची बैठक सागर बंगल्यावर झाली. या बैठकीतही मराठा आरक्षणावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीला OBC नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी देखील हजेरी लावली. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसी समुदायाची काय भूमिका असेल,याबाबत चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. उद्यामंगळवारी, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने नेमलेल्या न्या. शिंदे यांच्या समितीने सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. या समितीला मुदतवाढ मिळाली असली तरी प्राथमिक निष्कर्षाच्या आधारे सरकारकडून मराठा समुदायाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.


बीडमधील काही राजकीय नेत्यांचे कार्यालय-घरे जाळल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. तसेच काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी होणार लागू होण्याची शक्यता आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठकझाली. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ देखील उपस्थित होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत मराठा आंदोलन, सध्याची परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी आणि जमाव बंदी लागू होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)