गर्दी, भांडणे तसेच सामान्य नागरिकांसाठी व्यवस्था नसल्याने लालबाग राजाच्या मंडळाविरोधात तक्रार
सप्टेंबर २३, २०२३
0
मुंबई : मुंबईतील लालबागचा राजा मंडपात मंडळाचे पदाधिकारी मनमानी करतात, भाविकांना मारहाण करतात, मोठ्या व्यक्तिसाठी विशेष दर्शनाची सोय मात्र, सामान्य नागरिकांसाठी कुठलीच सोय नसल्याचा आरोप करत लालबागचा राजा मंडळा विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी ही तक्रार केली आहे.
लालबागचा राजा हा मुंबईतील प्रसिद्ध गणपती आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज येत असतात. मात्र, मंडळाच्या नियोजन शून्य कारभारामुळे भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात भांडणे होत असतात. नुकतीच अशीच एक घटना उघडकीस आली होती. दरम्यान, व्हीव्हीआयपींना दर्शन देताना विशेष काळजी मंडळातर्फे घेतली जाते. मात्र, सामान्य नागरिक वृद्ध आणि लहान मुलांकरता कोणतीही विशेष व्यवस्था नाही, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांच्या सुरक्षीततेची जबाबदारी मंडळ घेत नाही. या ठिकाणी येणाऱ्या वृद्ध, लहान मुलं आणि महिलांच्या सुरक्षेकडे मंडळ दुर्लक्ष करत असून उलट या सामान्य नागरिकांशी मंडळाचे कार्यकर्ते हुज्जतबाजी घालत असतात. या बाबीचा ताप नागरिकांना होतो. याची गंभीर दखल मुंबई पोलीसांनी घ्यावी, तसेच या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.नुकतीच लालबागच्या राजाच्या मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये हाणामारीचा प्रसंग घडला होता. पदाधिकाऱ्यांनी भाविकांना जबर मारहाण केली होती. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
Tags