विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब
ऑगस्ट ०१, २०२३
0
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसनं विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे. विदर्भातील आक्रमक नेते विजय वडेट्टीवार यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या आघाडीनं वर्षभरापूर्वी अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड केली होती. मात्र, अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानं विधानसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. संख्याबळानुसार काँग्रेसनं या पदावर दावा केला होता. शिवसेना वा राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यास हरकत घेतली नाही.
काँग्रेसमधून विरोधी पक्षनेते पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. त्यात नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, संग्राम थोपटे यांच्याही नावांची चर्चा होती. मात्र, पटोले हे प्रदेशाध्यक्ष असल्यानं त्यांचं नाव मागे पडल्याचं बोललं जातं. अशोक चव्हाण हे सौम्य स्वभावाचे नेते आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडं विधीमंडळ पक्षाचं गटनेते पद आहे. त्यामुळं त्यांची नावं मागे पडल्याचं बोललं जातं. पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांनाही पक्षश्रेष्ठींनी या पदासाठी विचार केला नाही. त्याऐवजी आक्रमक स्वभावाच्या व तुलनेनं तरुण नेते असलेल्या वडेट्टीवार यांच्यावर पक्षानं विश्वास दाखवला आहे.