ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून दिवसा होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी
ऑगस्ट ०२, २०२३
0
ठाणे : मुंबई नाशिक मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर असलेले खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून दिवसा होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या बाबत मंगळवारी आदेश देण्यात आले आहे. येथील अवजड वाहनांची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार जेएनपीटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे मुंबई-नाशिक महामार्ग आणि गुजरातकडे जाण्यासाठी शिळफाटा येथे जाणाऱ्या अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुंबईकडून मुलुंड आनंदनगर टोलनाकामार्गे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना देखील पुढील महिनाभर येथून जाण्यास बंदी राहणार आहे. यासोबतच नाशिककडून येणाऱ्या अशा वाहनांना शहापूर येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, या वाहनांना शहापूर येथून राष्ट्रीय महामार्ग तीनवरून डावे वळण घेत सापगाव-मुरबाड-कर्जत-चौक फाटा या मार्गे जेएनपीटीकडे जाता येणार आहे.
मुंबई नाशिक महामार्गाने रोज हजारो वाहने जात असतात. मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून निघणारी अवजड वाहने भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी घोडबंदर, शिळफाटा, मुंब्रा बायपास आणि मुंबई-नाशिक महामार्गाने जात असतात. येथील अवजड वाहतुकीमुळे या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. याचा फटका नागरिकांना बसत असल्याने, या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांना पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पुढील महिनाभर या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे, असे ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी सांगितले.