मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पालिकेकडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर अनेक गणेश मंडळांनी महाकाय गणेशमूर्ती मंडपात दाखल करण्यात सुरुवात केली आहे. याशिवाय गणेश मूर्तीचं आगमन आणि विसर्जन सोहळ्याचीही जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेने मुंबईतील गणेश मंडळांना शहरातील धोकादायक पूलांवरून गणेश मूर्तीची वाहतूक करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गणरायाचं आगमन आणि विसर्जन करत असताना पुलावर जास्त वेळ न थांबण्याच्या सूचना महापालिकेकडून करण्यात आल्या आहे.
बईतील धोकादायक पूल कोणते?
मुंबई महापालिकेने गणेश मंडळांना खबरदारीच्या सूचना जारी करताना शहरातील धोकादायक पूलांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये घाटकोपर येथील रेल्वे ओव्हर ब्रीज, करीरोडचा रेल्वे ओव्हर ब्रीज, चिंचपोकळीतला (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रीज, भायखळ्यातील रेल ओव्हर ब्रीज, महालक्ष्मी परिसरातील स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज, प्रभादेवीतला कॅरोल रेल ओव्हर ब्रीज, दादरचा टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज, मरीन लाईन्सवरील रेल्वे ओव्हर ब्रीज, सँडहर्स्ट रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज, ग्रँटरोड परिसरातील फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज, केनडी रेल्वे पूल, फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज आणि मुंबई सेंट्रल जवळील बेलासीस हे पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता गणेश मूर्तीचं आगमन आणि विसर्जन करताना अधिकची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.