संभाजी भिडे यांचं अकोल्यातील बाळापूर नाका परिसरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यात बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, आतापर्यंत हिंदुस्थानात अनेकांनी आक्रमणं केलेली आहे. बाहेरील टोळ्यांनी पाचशेहून वर्ष गोंधळ घातला. जगातल्या ५२ मुस्लिम राष्ट्रांपैकी ३९ मुस्लीम देशांनी हिंदुस्तानावर आक्रमण केलं. इतकंच नाही तर ते स्वत:च्या आई देखील मानत नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. व्याख्यानात संभाजी भिडे यांनी हिंदुस्थानावर आक्रमण, भारत-चीन युद्ध आणि बाजारपेठेवर विदेशी वस्तूंचे वर्चस्व या मुद्द्यांवर आक्रमकपणे भाष्य केलं. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी अमरावतीत झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचे वडील मुस्लीम असल्याचा जावईशोध लावला होता. मोहनदास हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पूत्र होते. करमचंद यांच्या चौथ्या पत्नीला मुस्लीम जमीनदाराने पळवून नेलं होतं. लव्ह जिहाद आणि पळवून नेणं यात काहीही फरक नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यामुळं आता सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. अमरावतीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.