मुंबई ठाण्यासह ७ जिल्ह्यांना ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी
जुलै १८, २०२३
0
मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस उशिरानं दाखल झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पावसाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा देखील गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. पाऊस समाधानकारक नसल्यानं काही ठिकाणी पेरण्या खोळंबलेल्या आहेत. मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई विभागीय हवामान केंद्रानं पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. यामध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्याला १७ आणि २१ जुलै रोजी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, १८ ते २० जुलै दरम्यान ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात १७ ते २० जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर, २१ जुलै रोजी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. १७ ते १९ जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून २०-२१ जुलै रोजी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
रायगड आणि रत्नागिरीसाठी पुढील चार दिवस खूप महत्त्वाचे आहेत. दोन्ही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं दोन्ही जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
सिंधुदुर्गला पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, धुळे जिल्ह्याला उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.