स्टार (*) चिन्ह असलेली ५०० रुपयांची नोट बनावट असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं महत्त्वाचा खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटसंदर्भातील एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 500 रुपयांच्या नोटचा फोटो देण्यात आला आहे. या नोटच्या सीरिअल नंबरमध्ये स्टार चिन्ह (*) आहे. ही पोस्ट करणाऱ्या युजरने स्टार चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट बनावट असल्याचा दावा केला आहे.
आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, नोटांच्या बंडलमध्ये क्रमवार लावलेल्या एखाद्या नोटेची छपाई सदोष आढळल्यास किंवा ती नोट वापर करण्यायोग्य नसल्यास अशा नोटांच्या जागी जी नोट टाकली जाते, त्यावर हे चिन्ह टाकलं जातं.
आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार स्टार मार्क असलेली नोट २००६ पासून चलनात आहे. नोटांच्या छपाईची प्रक्रिया सुलभ करणे आणि खर्चात बचत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. यापूर्वी रिझव्र्ह बँक चुकीच्या छापील नोटा बदलून त्याच क्रमांकाच्या योग्य नोटा बंडलमध्ये टाकत असे. मात्र, नवीन नोट छापेपर्यंत संपूर्ण बॅच वेगळी ठेवावी लागत असे. त्यामुळं वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असे. त्यामुळं तारांकित चिन्हाची पद्धत लागू करण्यात आली. या पद्धतीमुळं अयोग्य नोट तात्काळ बदलण्याचा मार्ग मोकळा झाला.