अनेक शहरांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी ; पानवाल्यांची दुकानं बंद करण्याची मागणी

0

Maharashtra Assembly Mansoon Session : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांनी चांगलाच गाजवला आहे. किरीट सोमय्यांचा व्हायरल व्हिडिओ, शेतकरी प्रश्न आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच रात्री ११ वाजेनंतर पानवाल्यांची दुकानं बंद करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामध्ये गांजा, चरस, एमडी अशा पदार्थांचा सामावेश आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे युवा पिढीमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या गैरप्रकारामध्ये व्हाट्सअपचा वापर केला जातो असा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

अंमली पदार्थांच्या किंमती अमर्याद वाढल्या असून अनेक तरूण याच्या आहारी गेले आहेत. जोपर्यंत पोलीस यंत्रणा सतर्क होत नाही तोपर्यंत यावर आळा बसणार नाही. या अवैध धंद्याच्या बाबतीत पोलिसांना सगळी माहिती असते. पण त्यांना अमर्याद अधिकार दिले तर हे बंद होऊ शकते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

अंमलीपदार्थ विरोधी पथकामध्ये मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे पोलीस भरतीसोबत या विभागातही भरती करणार का? आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यासाठी काही वेगळे धोरणे राबवणार का? अशी दोन प्रश्न पुन्हा रोहित पवारांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना "या विभागासाठी १८ हजार जणांची भरती काढली आहे, त्यामुळे मनुष्यबळाची कमी पडणार नाही." असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. अंमली पदार्थ तस्करी आणि अवैध कामांविरोधात कारवाई केली जाईल असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्याचबरोबर प्रशासनातील जे अधिकारी या अवैध कामधंद्यामध्ये सहभागी असतील त्यांना बडतर्फ केलं जाईल असंही ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)