मुंब्र्यातील कौसा परिसरात एका इमारतीत दूध विक्रेत्याचा मृतदेह
जुलै १९, २०२३
0
ठाणे : मुंब्र्यातील कौसा परिसरातल्या एका इमारतीत दूध विक्रेत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला असून जटाशंकर पाल असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो इमारतीत दूध वितरणाचं काम करत होता. त्यानंतर आता पोलिसांनी तातडीने जटाशंकर पाल याचा मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
इमारतीत दूध विक्री केल्यानंतर जटाशंकर पाल लिफ्टचं बटण दाबत गेला. परंतु लिफ्टची ट्राली वरच्या मजल्यावर होती. परंतु आत शिरल्यानंतर काही कळायच्या आत जटाशंकर दूधाच्या किटल्यांसह खाली पडला असावा आणि त्यामुळंच त्याचा लिफ्टमध्ये मृत्यू झाल्याचा अंदाज मुंब्रा पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून पोलिसांकडून इमारतीतील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. तसेच ज्या लिफ्टमध्ये जटाशंकरचा मृत्यू झाला, ती लिफ्ट तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्र्याच्या कौसा परिसरातील अनमोल एमराल्ड इमारतीत जटाशंकर पाल हा व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून दूध वितरणाचं काम करत होता. परंतु दूध विक्री केल्यानंतर तो घरी परतला नाही, त्यामुळं पाल याच्या कुटुंबियांनी थेट इमारतीत धाव घेत त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी इमारतीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर इमारतीतील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जटाशंकरचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर जटाशंकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.