कल्याण : पूर्वेतील मेट्रो मॉल जवळील उर्दू शाळेच्या परिसरात शुक्रवारी सकाळी घरगुती सिलिंडर वाहून नेणारा ट्रक रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्यावर उलटला.
सुचक नाक्यावरून कल्याण पश्चिमेला ट्रक जात असताना वाहन चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि अवजड ट्रक रस्त्यावर पलटला. ट्रक पलटी होताच मोठा आवाज होत ट्रकमधील सिलिंडर रस्त्यावर पसरले. यामुळे काही वेळ या रस्त्यावर कोंडी झाली. सिलिंडरचा ट्रक पलटी झाल्यामुळे परिसरात काही वेळ घबराट पसरली.
सिलेंडर रस्त्यावर पसरल्याने इतर वाहन चालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका दिशेची वाहतूक बंद करत सिलेंडर व अपघात ग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू केले. एक दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक व सिलेंडर हटविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सिलिंडर जोराने रस्त्यावर आपटल्याने टाकी फुटून त्यामधून गॅस बाहेर येतो की काय अशी भीती रहिवाशांमध्ये पसरली. त्यामुळे कोणीही रहिवासी, वाहन चालक सुरुवातीला या ट्रकच्या परिसरात बचाव कार्यासाठी आला नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा काही वेळ कोंडी झाली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.
वाहतूक पोलिसांनी एका बाजूचा रस्ता बंद कर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू केलं. तसेच रस्त्यावरील सिलिंडर धोकादायक नाहीत याची खात्री करुन ते रस्त्याच्या एका बाजुला ढीग लावून ठेवण्यास सुरुवात केली. उलटलेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजुला करुन तात्काळ वाहतूक सुरळीत केली.