Datta Samant Murder Case कामगार संघटनेचे नेते दत्ता सामंत (Datta Samant killing) यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने (CBI court) निकाल दिला आहे. गँगस्टर छोटा राजनला कोर्टाने क्लीन चीट दिली आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी ठोस पुराव्याअभावी कुख्यात गुंड छोटा राजनची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. राजन याने सामंत यांची हत्या करण्याचा कट रचला होता हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने (SPECIAL CBI Court) छोटा राजनची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे.
दत्ता सामंत हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टात आज सुनावणी पार पडली. न्यायाधीश ए एम पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. प्रमाणित पुराव्यांच्या अभावी राजेंद्र निकाळजे अर्थात छोटा राजन निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. दत्ता सामंत पवई ते घाटकोपरच्या पंतनगर येथे जात असताना पद्मावती रोडवर त्यांच्यावर हल्ला झाला होता. पोलिसांच्या माहितीप्रमाणे 4 अज्ञात आरोपी बाईकवर आले होते. त्यांनी दत्ता सामंत यांची गाडी रोखली आणि त्यांच्यावर जवळपास 17 गोळ्या फायरिंग करून निर्घृण हत्या केली होती.
याप्रकरणात 2000 मध्ये, दोन शूटर्ससह तीन जणांना हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते. तर राजनचे नाव या प्रकरणात वॉन्टेड आरोपींमध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी राजनच्या सहभागाचा दावा केला होता आणि आरोप केला होता की आरोपींपैकी एकाचा नातेवाईक त्याला भेटला होता. देशातून पळून गेलेल्या राजनला 2015 मध्ये इंडोनेशियामध्ये अटक करून मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध प्रलंबित असलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. ऑगस्ट 2021 मध्ये त्याच्याविरुद्ध खुनाचा खटला सुरू झाला. मात्र आता पुराव्यांअभावी राजनची या प्रकरणातून मुक्तता झाली आहे.