शारीरिक संबंध ठेवा सर्व दुःख दूर होतील; भोंदूबाबाचा अनेकांवर बलात्कार
जुलै २५, २०२३
0
मुंबई : मुंबईच्या मीरा भाईंदर येथून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. या परिसरातील महिलांना माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याने तुमचे दु:ख दूर होईल, असे सांगत एका भोंदूबाबाने अनेकांवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. एका पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकार उजेडात आला. आरोपीविरोधात बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भाईंदर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भाईंदर येथील ३५ वर्षीय पीडित महिलेने भोंदूबाबाविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडिता गेल्या काही वर्षांपासून अनेक समस्यांचा सामना करत होती. दरम्यान, ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीच्या सांगणावरुन ती भोंदूबाबाकडे गेली. त्यावेळी भोंदूबाबाने तिचे दुःख करण्यासाठी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवावे लागतील, असा उपाय सांगितला. जसजसे संबंध ठेवत जाशील तस तसे तुझे दुःख दूर होईल, अशा भूलथापा देऊन या भोंदूबाबाने पीडित महिलेवर तब्बल पाच वर्ष बलात्कार केला.
महत्त्वाचे म्हणजे, या घटनेतील आरोपी भोंदूबाबा विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी माहिती पीडिताने दिली. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या भोंदूबाबाने आतापर्यंत किती महिलांवर अत्याचार केले? याचाही पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा भोंदूबाबाच्या कोणत्याही भूलथापांना बळी पड नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.