ठाणे : आर्मी किंवा पोलीसमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाण्यातील एका तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनीष उतेकर ( वय 23 ), असे या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्याच्यावर कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर वाहतूक पोलिसांच्या कथित जाचाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केली. ट्रॅफिक पोलीस त्रास देत असल्याचा मेसेज त्याने आपल्या आईला पाठवला होता. आईला मेसेज पाठवल्यानंतर तरुणाने आत्महत्या केली.
16 जुलैला ठाणे वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम सुरू होती. त्यावेळी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मनीष उतेकर हा कोपरी येथून आपल्या मित्रांबरोबर घरी जात होता. तेव्हा त्याने मद्यपान केले होते. वाहतूक पोलिसांच्या सुरू असलेल्या मोहिमेत मनिष सापडला. मनीषच्या शरीरात अल्कोहोलचे 176 टक्के प्रमाण आढळले. त्यानंतर मनिष उतेकरवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह' शी संबंधित कलमांतर्गत कारवाई केली. यावेळी मनिषला आपल्या करिअरबाबत भीती वाटू लागली. त्याने पोलिसांना पाया पडून विनंती केली. मात्र तुम्ही उद्या न्यायालयात हजर राहण्यासाठी, या असे पोलिसांनी सांगितले. तेव्हा दुसऱ्या दिवशी मनिष हा वाहतूक पोलिसांना भेटायला गेला. कृपया मला कोर्टात घेऊन जाऊ नका, मी येथेच आपली माफी मागून दंड भरतो असे मनीषने सांगितले. मात्र वाहतूक पोलिसांनी त्याला धमकी दिल्याचा आरोप त्यांने आपल्या मेसेजमध्ये केला आहे. तुझे करिअर बरबाद होईल, अशी भीती मनिषला दाखवली. आपले करिअर खराब होणार असल्याच्या भीतीमुळे मनिषने आत्महत्येचे पाऊल उचलले. दरम्यान मनिषने या घडलेल्या प्रकरणाचा मेसेज आपल्या आईला केला होता. आईला मेसेज केल्यानंतर शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाहतूक पोलिसांच्या तपासणीमध्ये मनीषच्या शरीरात अल्कोहोल मिळाले होते, तसा गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारून मिटविण्यात यावे, अशी मनीष आणि त्याच्या मित्रांची अपेक्षा होती, असे श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी सांगितले. मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या नावाचे कोणीही पोलिस वाहतूक शाखेत काम करीत नाहीत. तरीही कुटुंबीयांच्या आरोपांचीही तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले.
मृत्यूपूर्वी आईला केला मेसेज
मृत्यूपूर्वी मनीष याने आईला मोबाइलवरून केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले होते. त्यांनी न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. पुष्पक आणि सुधाकर या पोलिसांनी करिअर बर्बाद करायचे असल्याचे सांगितले. ट्रॅफिक पोलिसांचा मान राखतो; पण कोणासोबत असे वागू नका.
या प्रकरणात त्यांनी न्यायालयात जाणे नियमानुसार अपरिहार्य होते. न्यायालयात त्यांना दंड झाला असता. त्यांचा कोणीही मानसिक छळ केलेला नाही. ते दुसऱ्या दिवशी येताे, म्हणाले; पण आलेच नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती.ज्ञानेश्वर आव्हाडकोपरी वाहतूक वरिष्ठ पोलिस निरीक्षक