डोंबिवली : सोशल मीडियावर अल्पवयीन मुली आणि तरुणींशी ओळख वाढवून आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांच्या हद्दीत अशीच एक घटना घडली. इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडिताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून एका तरुणाला अटक करण्यात आली.
काशीनाथ पाटील (वय, २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी डोंबिवली पूर्वेतील रहिवाशी आहे. आरोपी आणि पीडिता यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या ओढून २४ जुलै २०२३ रोजी डोंबिवली पश्चिम येथे भेटायला बोलवले. यानंतर पीडितावर अत्याचार केले. महत्त्वाचे म्हणजे, दुपारी घरातून गेलेली मुलगी घरी न पतल्याने तिच्या कुटुंबीयांनी २५ जुलै रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची टिळकनगर पोलिसांत तक्रार दिली.
टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम. पी. मुंजाळ यांच्या पथकाने मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील तसेच स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मुलगी डोंबिवली स्टेशन परिसरात जाताना आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता बुधवारी रात्री मुलीचा शोध लागला. मुलीला वैद्यकीय तपासणी करता शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. तपासणीमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मुलीने तिच्यासोबत घडली हकीकत सांगितली. साधारण वर्षभरापूर्वी आरोपी काशिनाथ यांच्याशी मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीतूनच आरोपीने मुलीला फुस लावत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पुढील तपास टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुंजाळ या करत आहेत.
"अल्पवयीन पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री करुन आरोपीने तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्य केले आहे. याप्रकरणी बलात्कार आणि पॉस्को कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काशिनाथ रमेश पाटील असे आरोपीचे नाव आहे,"
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत बोराटे