भाजप-शिवसेना युतीत पहिली ठिणगी ; श्रीकांत शिंदेंचा खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा

0


ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. ते अनेक मुद्द्यांवर नाराज असल्याचे सांगितले जाते. गुरुवारी (08 जून) डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात शिवसेनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यामागे डोंबिवलीत एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपने डोंबिवलीत मोर्चा काढला. तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे

श्रीकांत शिंदे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून या निर्णयावर भूमिका मांडली आहे. श्रीकांत शिंदे भाजपच्या निर्णयावर म्हणाले की, “मी विधान ऐकलं. सोशल मीडियावर पाहिलं. मला वाटतं उमेदवार कोण, वरिष्ठ पातळीवर ते लोक नक्कीच ठरवतील. जो उमेदवार योग्य असेल, त्याला उमेदवारी देतील. पण, मला एवढेच सांगायचं आहे की, वेगळ्या विचाराने युती झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी एका विचाराने महाराष्ट्रात युती केली. महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होतं आहे. मला वाटतं कुठल्यातरी शुल्लक कारणावरून कुठल्यातरी वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे ठराव करतात की शिवसेनेला सहकार्य करायचं नाही. त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू, मला वाटतं ही आव्हानं खुप विचारपूर्वक दिली पाहिजे.”

भाजपकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांवर श्रीकांत शिंदे म्हणाले, “आम्हाला आव्हानं देण्याचं काम या लोकांनी करू नये. या ठिकाणी शिंदे यांनी दहा महिन्यापूर्वी जे केलं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे. जर हे पाऊल उचललं नसतं, तर काय परिणाम झाले असते, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. गेल्या 9 वर्षांपासून मला कल्याण लोकसभेतून मोठ्या मताधिक्याने जिंकून दिलं. तेव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय. आताच उल्हासनगरमध्ये 55 कोटी रुपये भाजपच्या नगरसेवकांना देण्याचं काम झालं. जीआर निघाला, त्याचे टेंडर निघतील. एवढं सगळं चांगलं काम सुरू असताना मला वाटतं कुणी शुल्लक कारणावरून युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये.”

मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार

खासदार श्रीकांत शिंदे म्हमाले, मला जर सांगितलं कल्याण लोकसभेचा (खासदारकीचा) राजीनामा द्या, तर मी उद्या राजीनामा द्यायला तयार आहे. पूर्णवेळ पक्षाचं काम आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. जर उद्या मला पक्ष नेतृत्वाने सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं, हवं तर तुम्ही सांगा तुम्हाला त्या ठिकाणी कल्याण लोकसभेसाठीचांगला उमेदवार मिळतोय, तर त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल तसा मी ही काम करायला तयार आहे. आमचा उद्देश एकच आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. आमचा हेतू इतका शुद्ध आहे. आमचा कुठलाही स्वार्थ नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)