कोविडची लस मोदीजींनी तयार केली.. मग बाकीच्या कंपन्या गवत उपटत होत्या का....
जून २०, २०२३
0
मुंबई : शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन सोमवारी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत साजरा केला गेला. षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तुफान टोलेबाजी केली.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या एका भाषणातील व्हिडिओही कार्यकर्त्यांना ऐकवत त्यावर मिश्किल टिप्पणी केली. या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस ‘कोविड लस पंतप्रधान मोदींनी तयार केली’ असा दावा करत आहेत. फडणवीसांच्या या दाव्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील हास्यजत्रेचा प्रयोग केला. कोविडची लस मोदीजींनी तयार केली... असं ते म्हणाले. मग बाकीच्या कंपन्या काय गवत उपटत बसल्या होत्या का? त्यांच्या हास्यजत्रेत अवली सगळीच आहेत, लव्हली कुणीच नाही... याला जनता कावली आहे. मोदी हे विश्वगुरूंचे विश्वगुरू... लस त्यांनी बनवली असली तर नक्कीच ब्रम्हांडही चालवतील.
हिंमत असेल तर देशांचे शत्रू संपवा, राजकारणातले शत्रू कशाला संपवताय? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मिंधे म्हणतात की नरेंद्र मोदी म्हणजे सूर्य... त्यांच्यावर थूंकू नका, अरे मग तुमचा सूर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे का प्रकाश पाडत नाही? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली..