भाजप-शिवसेनेत पुन्हा तणाव | ठाणे, कल्याण, पालघरही आमचेच ; आमदार संजय केळकर

0

ठाणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून मतदारसंघावर दावे केले जात आहेत. याचेच पडसाद भाजप-शिवसेना युतीत उमटताना पहायला मिळत आहेत. शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देण्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर बावनकुळे यांच्या विधानानंतर वादावर पडदा पडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतरही दोन्ही पक्षातील कुरबुरी संपलेल्या दिसत नाही. आधी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपने आता थेट ठाणे आणि पालघरवरही दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचा काल ठाण्यात मेळावा होता. यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 2014 मध्ये मोदींमुळे निवडून आलेले लोक आता ठाणे, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा करत आहेत. हे सर्वजण मोदी ट्रेनमध्ये बसूनच लोकसभेत निवडून गेले. यांनी आता लोकसभेच्या अनेक जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. याचे मला आश्चर्य वाटते. कल्याण, ठाणे, पालघरसह संपूर्ण ठाणे जिल्हा एकेकाळी भाजपच्या होता. कल्याणच काय ठाण्याची जागाही भाजपचीच आहे. आमच्या पक्षाचे रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी या जागांचे प्रतिनिधित्व केले आहे. असे वक्तव्य केळकर यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिले होते. त्यांचे हे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खा. श्रीकांत शिंदे यांना फारसे पटलेले नाही. यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.

ठाणे भाजपचा बालेकिल्ला - मंत्री रवींद्र चव्हाण

ठाणे लोकसभा मतदारसंघ जिंकणं अवघड नाही, त्यात मोठी संघटनात्मक ताकद आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा नेहमीच भाजपचा आहे हे विरोधकांना दाखवून द्यायचं आहे. आपली इथे अस्तित्वाची लढाई असून या लढ्यात भाजप कार्यकर्त्यांनी कमकुवत होता कामा नये. त्यांनी आपला संकल्प सोडू नये. त्यांनी बूथवर जाऊन आपली लढाई लढली पाहिजे, असा सल्ला भाजप नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. याचवेळी ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची आठवण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी करुन दिली.

लोकसभेच्या कल्याण, ठाणे मतदारसंघाची स्थिती अशी

राजन बाबुराव विचारे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१९ मध्ये विचारे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना एकूण ७,४०,९६९ मते मिळाली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश परांजपे यांनी निवडणूक लढवली होती. परांजपे यांना एकूण ३,२८,८२४ मत मिळाली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. २०१९ मध्ये त्यांना ५,५९,७२३ मते मिळाली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी बाळाराम पाटील यांना २,१५,३८० मते मिळाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)