मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या 14 जूनला वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राज्यभरात मनसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. तर याच धरतीवर दादरच्या शिवतीर्थ या परिसरात ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे’ अशा प्रकारचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मनसेकडून हे बॅनर्स लावण्यात आले असून, त्यावर हिंदूजननायक…, ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे’ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं लिहिण्यात आलं आहे. तसेच राज ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. त्यानंतर पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून, यावर काही पदाधिकाऱ्यांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. (Raj Thackeray's Birthday Banner Mentions Him As 'Future Chief Minister'.
भेटवस्तू आणू नका - राज ठाकरे
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत दाखल होतात. मात्र, या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी येताना पुष्पगुच्छ, मिठाई किंवा भेटवस्तू आणू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे.
झाडांची रोपे आणि शैक्षणिक साहित्य
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत येताना झाडांची रोपे आणि शैक्षणिक साहित्य घेऊन येण्याच्या आवाहन केले आहे. तर कोणतीही भेटवस्तू अथवा बुके आणू नये, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तुम्ही आणलेल्या शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाच्या वतीने पोहोचवले जाईल, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे. 14 जून रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत राज ठाकरे सर्वांना भेटतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
याआधीही भावी मुख्यमंत्र्यांचे लागले पोस्टर्स…
सध्या भावी मुख्यमंत्री असे पोस्टर किंवा बॅनर्स लावण्याची स्पर्धाच सुरु आहे. कारण याआधी देखील विविध पक्षातील विविध नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत, तर नाना पटोले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे व राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते, त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.