डोंबिवली : डोंबिवली पूर्व भाजपा मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर एका भाजपच्या महिला कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरून ३० मे रोजी मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात होता. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असून गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे. एकीकडे या प्रकरणाला राजकीय वळण लागले तर दुसरीकडे आता या बहुचर्चित विनयभंग प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच गुन्हे शाखा - युनिट ५ यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मानपाडा पोलीस स्थानकातील चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक लांडे यांनी दिली.
भाजपाचे पदाधिकारी नंदू जोशी यांनी आपली सदनिका आपणास खाली करण्यास भाग पाडले आणि आपल्याकडे वारंवार शारीरिक सुखाची मागणी केल्याची तक्रार पीडितने मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पीडितेचे आपल्या पतीसोबत गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. या प्रकरणात जोशी हस्तक्षेप करत असल्याचा पीडितेचा आरोप आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लावण्यात आले. माझे हे वयक्तिक न्यायाचे प्रकरण आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना राजकीय दबाव आणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. खरे तर न्यायासाठीची तळमळ व एकटी पिडीत महिला बघून कायद्याच्या चौकटीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पीडितेचे म्हणणे आहे.
मागील अनेक आठवड्यांपासून या प्रकरणामुळे कल्याण, डोंबिवलीचं राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. पीडित महिलेने स्थानिक पोलिसांवर भाजपा नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप केल्यानंतर आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने तपासाला वेग मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
आरोपीच्या अटकेसाठी पीडित महिलेचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
पीडित महिला मागील १५ दिवसांपासून पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करत आहे. जोशी यांना अटक करावी अशी या महिलेची मागणी आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारी जोशी यांना पाठीशी घातल असून त्यांना अटक केली जाऊ नये म्हणून पोलीस खात्यावर दाबाव आणत असल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. या प्रकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी विरुद्ध राजकारणी असा संघर्ष दिसून येत असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
पीडितेला जीवे मारण्याच्या धमकया
पीडित महिलेने गुन्हा दाखल करून तीन आठवडे उलटून गेले आहेत, तरीही अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होताच तुला जीवे ठार मारणार असल्याची धमकी तसेच अपघात करुन हत्या अथवा घातपात होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. आरोपीच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय. त्यामुळे पोलिसांनी लवकरातलवकर नंदू जोशी ला अटक करावी, अशी मागणी पीडित महिलेनं केलीय.