रिल बनवायला गेला अन् विहिरीत पडला, मदत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू
जून १४, २०२३
0
डोंबिवली : डोंबिवलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर रिल तयार करण्यासाठी गेलेल्या तरुणाला विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. मुंब्र्यातून रिल तयार करण्यासाठी तरुण मित्रांसोबत ठाकुर्लीत आला होता. परंतु रिल तयार करत असताना पाय घसरल्याने तो विहिरीत पडला, त्यानंतर काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला आहे. बिलाल शेख असं मृत तरुणाचं नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
ठाण्यातील मुंब्र्यात राहणारा बिलाल नावाचा तरुण मित्रांसोबत ठाकुर्ली येथे फिरायला आला होता. एका पंप हाऊसजवळ तो इन्स्टाग्रामवर रिल बनवत असताना तो अचानक विहिरीत कोसळला. त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु आजूबाजूला कुणीच नसल्याने काही मिनिटांतच बिलालचा मृत्यू झाला. बिलालच्या मित्रांनी तातडीने रेल्वे सुरक्षा दलाकडे धाव घेत त्यांना मदतीची मागणी केली. याशिवाय पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ३२ तासांच्या प्रयत्नांनंतर बिलालचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या लोकलमध्ये रिल बनवण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई धोक्याचा मार्ग पत्करत आहे. अनेकदा रेल्वे, समुद्र किंवा विहिरी अशा ठिकाणी जाऊन रिल तयार केल्या जात आहे. काही दिवसांपूर्वीच लोकल रेल्वेत रिल तयार करण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा रिल तयार करण्याच्या नादात ठाकुर्लीतील विहिरीत मुंब्र्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.